पिंपरी, दि.२६ – पिंपरी चिंचवड शहराने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जो नावलौकिक मिळविला आले त्यामध्ये अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे. शहरवासियांना सुलभ पद्धतीने जीवन जगता यावे यासाठी तसेच त्यांना सर्व आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यामध्येही अभियंते महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या याच कार्याचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे, असे प्रतिपादन करत आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड ज्युनियर इंजिनियर्स असोसिएशन यांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता मनोज सेठिया, अजय सुर्यवंशी, विजयकुमार काळे, बाबासाहेब गलबले, संजय खाबडे, तसेच नुकतेच महापालिका सेवेतून निवृत्त झालेले मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, पिंपरी चिंचवड ज्युनिअर असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल बेळगांवकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत कुंभार, सचिव संतोष कुदळे व पदाधिकारी यांच्यासह विविध विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच त्यांचे कुटुंबीय आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
नव्या पिढीच्या अभियंत्यांमध्ये कार्यक्षमता आणि नवनिर्मिती करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. त्यांना महापालिकेत काम करताना विविध विभागात कामकाज करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांच्या ज्ञान आणि अनुभवात कमालीची भर पडते. त्यांनी अनेक वर्षे महापालिकेत कार्यरत असलेल्या अनुभवी अभियंत्यांकडून कामकाजाचे तत्व आणि शैली आत्मसात केल्यास कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडेल, असेही आयुक्त सिंह म्हणाले.
शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, विविध राज्य व शहरातून आलेले नागरिक राहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला प्राधान्य देतात. नियोजित व सुसज्ज रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, सांस्कृतिक सभागृहे, रहदारीची व्यवस्था, स्वच्छता आदींमुळे नागरिकांचा आपल्या शहराकडे ओढा दिसतो. शहराला या उंचीवर घेऊन जाण्यामध्ये विविध घटकांसह अभियंत्यांचीही भूमिका महत्वपूर्ण आहे.
अभियंता दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मैदानी खेळ तसेच इनडोर खेळांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट, रायफल शुटिंग व खो-खो यासह बुद्धिबळ,कॅरम या खेळांचा समावेश करण्यात आला होता. त्यामधील यशस्वी खेळाडूंचा यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या वर्षीपासून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचे बांधकाम करणारे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांच्या नावे महापालिकेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्याची संकल्पना अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी मांडली होती. त्यानुसार यावर्षी हा पुरस्कार उप अभियंता चंद्रकांत मोरे आणि कनिष्ठ अभियंता वृषाली पाटील यांना प्रदान करण्यात आला.
